Divya Khosla Kumar Allegation On Sonu Nigam


मुंबई : ‘भूषणकुमार तुझ्याकडे आले आणि म्हणाले, सोनू मला अबू सालेमपासून वाचव. तसं ते म्हणाले असतील तर ते तुझ्याकडे आले कारण तुझे आणि अबू सालेमचे संबंध होते. सोनू आणि अबू यांचे कसे संबंध होते याचा तपास झाला पाहिजे. मरीना कुंवरच्या व्हिडीओची धमकी तू आम्हाला देतोस. पण मरीनाचा तो हवाला खोटा होता. हे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मी टू मुव्हमेंटवेळी अनेक मुलींनी अनेकांवर पैशासाठी खोटे आरोप केले. इतकंच कशाला, आत्ता मी करू का तुझ्यावर मी टूचा आरोप?’ असे खणखणीत बोल सुनावत भूषणकुमार यांची पत्नी दिव्या खोसला-कुमारने सोनू निगमच्या व्हिडीओला आणि त्याने सुरू केलेल्या कॅम्पेनला उत्तर दिलं आहे. आता तिच्या या वक्तव्यावर सोनू काय म्हणतो हे पाहाणं कुतुहलाचा विषय ठरलं आहे.

सोनूने केलेल्या आरोपांचं खंडन दिव्याने आपल्या व्हिडीओत केलं आहे. ‘सोनू दिल्लीच्या जत्रेत पाच रूपयांसाठी गात होता. त्यानंतर गुलशन कुमार यांनी त्याला विमानाचं तिकीट काढून दिलं, मुंबईत आणलं आणि सोनूला मोठं केलं. परंतु त्यानंतर 1990 च्या सुमारास टी सीरीज डगमगू लागली. त्यावेळी ज्यांनी ब्रेक दिला त्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सोनू दुसऱ्या कंपनीला जाऊन मिळाला. त्यानंतर भूषणने कंपनी टेकओव्हर केली. सोनू दुसऱ्या कंपनीला जाऊन मिळाला होता. त्यामुळे भूषण यांनी सोनूला गाणं गाण्याची विनंती केली. शिवाय, स्मिता ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांना भेटव असं सांगण्यामागे त्याच्या ओळखी होत्या म्हणून सांगितलं. त्याच न्यायाने भूषणकुमार सोनूला अबू सालेमपासून वाचव असं सोनूला का म्हणाले, याचा विचार व्हावा. कारण सोनू आणि अबूचे संबंध होते. उलट या संबंधांची चौकशी व्हायलाच हवी,’ असं दिव्याने सांगितलं.

सोनू निगमने मरीना कुंवरचा उल्लेखही आपल्या व्हिडीओत केला. त्याचाही समाचार दिव्याने घेतला आहे. ती म्हणाली, मी टू मुव्हमेंट खूप चांगली आहे. पण तिचा गैरफायदाही अनेक मुलींनी घेतला. मरीना ही त्यापैकीच एक होती. भूषणवर तिने आरोप केल्यानंतर त्याची पोलीस चौकशी झाली. त्यात ते आरोप फाजिल असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सोनूने आम्हाला धमक्या देऊ नयेत. असे फाजिल आरोप मीही सोनूवर करू का? असा सवाल तिने विचारला आहे. सोनूच्या या कॅम्पेननंतर अनेक गायक-कलाकार आम्हाला फोन करून त्रास देऊ लागले आहे. भूषणला मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. माझ्यावरही बलात्कार करू अशा धमक्या येऊ लागल्यात. माझ्या मुलालाही मारण्याच्या धमक्या येऊ लागल्यात. हे मी कधीही सहन करणार नाही असं ती सांगते.

गायक सोनू निगम, टी-सीरीजचे भूषण कुमारमधील वाद पेटला

टी सीरीजने अनेकांना ब्रेक दिला आहे. पण येणारी मंडळी इतकी असतात की प्रत्येकाला ब्रेक देणं शक्य होत नाही. पण ती मंडळी दुखावली जातात. याचा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा असं ती या व्हिडिओत सांगते.

सोनू निगमने सुशांत सिंगने आत्महत्या केल्यानंतर दोन व्हिडीओ केले. पैकी एकात कुणाचंही नाव न घेता त्याने संगीतसृष्टीत सुरू असलेल्या दडपशाहीबाबत वाचा फोडली. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहून त्याने दुसऱ्या व्हिडीओत भूषणकुमार यांचं नाव घेत त्यांना मरीना कुंवरची आठवण करून देत धमकावलं. त्यावेळी भूषणकुमार कसा आपल्याकडे आला होता.. आपली ओळख करून दे म्हणून आग्रह धरतानाच अबू सालेमपासून मला वाचव असं कसं आपल्याला म्हणत होता याचा व्हिडीओ त्याने करून टाकला. त्यानंतर सोनूच्या पाठिशी सुनील पाल, अदनान सामी असे अनेक लोक उभे राहिले. पण त्यावेळी दिव्या खोसला-कुमारने केवळ इन्स्टा स्टोरी पोस्ट करून सोनूची ही स्टंटबाजी करत असल्याचं म्हटलं होतं. परंतु दोन दिवसांनंतर दिव्याने इन्स्टा लाईव्ह करून सोनूच्या आरोपांचं खंडन केलं आहे. याचा दाखला देण्यासाठी तिने त्यांचा कूक जो कुमार यांच्याकडे 1988 पासून आहे, त्यालाही या व्हिडिओत आणलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *