Ex Navy Veteran Molested By Shiv Sena Workers For Writing Post Against Uddhav Thackeray Kangana Ranaut Criticises Government

मुंबई : मुंबईत आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना आता शिवसेना कार्यकर्त्यांनी नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल घडला आहे.  यावरुन राजकीय टीका तर होऊ लागल्या आहेतच. मात्र यावर अभिनेत्री कंगना रनौतनं देखील व्हिडीओ ट्वीट केला असून तिनं पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मदन शर्मा हे निवृत्त नौसेना अधिकारी राहतात. काल त्यांनी महानगर 1 नामक एका व्हॉट्सअॅप ग्रुप वर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे घर गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

याबाबत बोलताना कंगना म्हणाली की, महाराष्ट्रात सरकारचा आतंक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज शिवसेना कार्यकर्त्यांनी दिवसाढवळ्या सर्वांसमोर एका माजी सैनिकाला बेदम मारहाण केली. इतक्या लोकांनी एका माणसाला मारहाण केली. त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी सरकारवर टीका केली, असं कंगनानं म्हटलं आहे.

या प्रकरणी समता नगर पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आणि त्यांना तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे. कमलेश कदम, संजय मांजरे, राकेश बेळणेकर, प्रताप सुंदवेरा, सुनिल देसाई, राकेश मुळीक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कडक कारवाई करा- उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं या घटनेबाबत ट्वीट करत म्हटलं आहे की, एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केलेलं हे दृश्य त्रासदायक आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन करते की यासंदर्भात कडक कारवाई करावी, असं उर्मिलानं म्हटलं आहे.

गुंडाराज थांबवा, भाजपची टीका

या प्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत असून यामुळे पुन्हा मुंबई मध्ये राजकीय युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून गुंडाराज थांबवा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी देखील व्हिडीओ ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.

भाजप नेत्यांना आता लोकशाही आठवते – काँग्रेस

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कारवाई केली. पण ज्या भाजप नेत्यांना आता लोकशाही आठवते त्यांना आठवण करून दिली पाहिजे की फडणवीस परिवाराचा फोटो ट्विट केला म्हणून अजय हातेकरला पोलिसांनी अटक केली होती. दांभिक भाजपा!, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 325 आणि दंगलीशी संबंधित तरतुदींअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांची जामीनावर सुटका झाली. यावरुन भाजप आक्रमक झाली. जी कलम लावण्याची गरज होती ती न लावल्याने आरोपींची सुटका झाली. यावरुनच पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं दिसतं असा आरोप करत भाजपने सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

भाजपचं ठिय्या आंदोलन

मारहाण करणाऱ्यांविरोधात कलम 326 आणि 452 कलम लावण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली. यानंतरच्या त्यांच्या कार्यालयाबाहेर भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वाच ठिय्या आंदोलन केलं. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा या संदर्भातील कलमांबाबत अभ्यास करुन पुढील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. तसंच पोलिसांवर सरकारचा दबाव नसल्याचं सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

सहपोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित

यादरम्यानच प्रवीण दरेकर यांनी फोनवरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर आजचं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *